🔥 TRENDING भाजपा की लगातार जीत: राहुल गांधी और इं... टीकमगढ़ पॉलीटेक्निक में कैरियर एवं उद्... દિયોદર પાસે અકસ્માત सागर संभाग: कमिश्नर ने जारी की विभागीय... West Bengal Teams Up with NICDC to Boo... टीकमगढ़ में सेवा संकल्प अभियान के तहत...
09 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
सावदा पोलिस हद्दीत धक्कादायक घटना - न्यायालयात जाणाऱ्या तरुणीला चारचाकीतून उचललं, मंगळसूत्र तुटेपर्यंत आईला मारहाण...!!

सावदा पोलिस हद्दीत धक्कादायक घटना - न्यायालयात जाणाऱ्या तरुणीला चारचाकीतून उचललं, मंगळसूत्र तुटेपर्यंत आईला मारहाण...!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 09 Oct 2026, 08:14 PM 👁 8
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

रावेर / सावदा : रावेर तालुक्यातील एका गावातील 24 वर्षीय तरुणीला तिच्या इच्छेविरुद्ध चारचाकी वाहनातून बळजबरीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि. 8 रोजी पहाटे पिंपरुड-सावदा रस्त्यावर घडली आहे. उच्च न्यायालयात सुनावणीसाठी जात असतानाच हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात टेकचंद रविंद्र सरोदे (रा. रोझोदा, ता. रावेर) याच्यासह तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, बेपत्ता तरुणीचे यापूर्वी टेकचंद सरोदे याच्यासोबत लग्न झाले होते. मात्र त्यानंतर ती आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. या प्रकरणासंदर्भात न्यायालयीन वाद सुरू असून गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होती. त्यासाठी ही तरुणी तिच्या आई-वडिलांसोबत मोटारसायकलवरून भुसावळकडे निघाली होती.

पहाटे सुमारे 5.15 वाजता पिंपरुड-सावदा रस्त्यावर स्मशानभूमीपासून काही अंतरावर वळणाजवळ त्यांच्या मोटारसायकलला मागून आलेल्या ग्रे रंगाच्या चारचाकी वाहनाने धडक दिली. धडकेनंतर वाहनातून तीन जण खाली उतरले. त्यापैकी दोघांनी चेहऱ्यावर काळे मास्क लावले होते, तर टेकचंद सरोदे याचा चेहरा उघडा असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.

त्यानंतर तिघांनी स्प्रेच्या सहाय्याने तरुणी आणि तिच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर फवारणी केली, ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांची आणि चेहऱ्याची प्रचंड जळजळ होऊ लागली. याचाच फायदा घेत तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यावर तिला मारहाण करण्यात आली.

मुलीला वाचविण्यासाठी तिच्या आईने हस्तक्षेप केला असता तिलाही चापट बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या झटापटीदरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तुटून पडल्याचेही फिर्यादीने सांगितले आहे. दरम्यान, दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीला पकडून ठेवत मारहाण केली, तर टेकचंद सरोदे याने तरुणीला बळजबरीने वाहनात बसविल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर तिघेही कारमध्ये बसून पिंपरुडच्या दिशेने भरधाव निघून गेले.

घटनेनंतर फिर्यादी आणि त्यांची पत्नी सावदा पोलीस ठाण्यात दाखल झाले. दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

या प्रकरणी सावदा पोलिसांनी अपहरण आणि मारहाणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक गणेश पांडुरंग फड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून बेपत्ता तरुणीचा तसेच घटनेत वापरण्यात आलेले चारचाकी वाहन आणि इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे. तक्रारदाराने वाहन आणि चेहरा झाकलेल्या संशयितांना समोर आणल्यास त्यांची ओळख पटवू शकत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
📲Get App