🔥 TRENDING हाथी मंदिर के पास खराब पड़ा वाटर कूलर,... Preity Zinta Says Lower Theatre Attend... Arunachal CM Khandu Flags Off 40 Stude... Upper Subansiri Project in Arunachal P... Arunachal Pradesh Governor Calls for E... J&K CM Omar Declares Statehood Demand...
25 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

प्रवाशाच्या हातातून रोकड हिसकावणारा गजाआड; १६ हजारांची रक्कम पोलिसांनी केली हस्तगत...!!

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 24 Sep 2026, 09:00 PM 👁 17
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

जळगाव - शहरातील नवीन बसस्थानक परिसरात भर दिवसा प्रवाशाच्या हाताला झटका मारून २१ हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून पळून गेलेल्या सराईत गुन्हेगाराला जिल्हापेठ पोलिसांच्या विशेष पथकाने जेरबंद केले आहे. आरोपीकडून चोरी गेलेल्या रकमेपैकी १६ हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानक परिसरात एक प्रवासी उभा असताना अज्ञात चोरट्याने त्याच्या हातातील २१ हजार रुपयांची रोकड हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी पीडित प्रवाशाने १९ सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून गु.र.नं. ३१५/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तात्काळ तपासाचे चक्रे फिरवून सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. पथकाने बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करून गोपनीय खबऱ्यांचे जाळे सक्रिय केले.

तपासादरम्यान संशयित आरोपी नवीन बसस्थानकाजवळील भजी गल्ली परिसरात घुटमळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पथकाने भजी गल्लीत सापळा रचून संशयित भिकन पंडीत शर्मा (वय ६०, रा. तलाव गल्ली, पारोळा) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने जबरी चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून १६ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

अटक करण्यात आलेला आरोपी भिकन शर्मा हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीच चोपडा शहर पोलीस ठाण्यात २, पारोळा पोलीस ठाण्यात ३ आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यात १ असे फसवणूक, तोतयागिरी आणि जबरी चोरीचे एकूण ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद शेवाळे, सहा. पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोलीस अंमलदार महेश महाजन, नरेश सोनवणे, तेजस मराठे, दीपक पाटील, प्रवीण जाधव, समाधान पाटील, प्रशांत लाड, कमलाकर बडगुजर आणि अजय अहिरे यांच्या पथकाने केली.
📲Get App