कृषि
मुरबाड तालुक्यात पावसाअभावी भात पिके करपली; शासकीय अनास्थेविरोधात बळीराजा आक्रमक.
यहाँ देखें:
▶️ YouTube
मुरबाड तालुक्यात पावसाअभावी भात पिके करपली; शासकीय अनास्थेविरोधात बळीराजा आक्रमक • दुष्काळ यादीतून ठाणे जिल्हा वगळल्याने शेतकरी संतप्त • तातडीने पंचनामे करून प्रत्यक्ष शेतमजुरांनाही नुकसानभरपाई देण्याची लोकमित्र रमेश हिंदुराव यांची मागणी मुरबाड (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करताना ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना यातून वगळले असले, तरी प्रत्यक्षात मात्र मुरबाड तालुक्यात निसर्गाने घात केला आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे ऐन कापणीच्या हंगामात आलेली भात पिके डोळ्यादेखत जळून खाक झाली आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांनी आता प्रशासनाविरोधात आक्रमक पाऊल उचलले असून, संपूर्ण तालुक्यातील पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात तालुक्यातील न्हावे गावातील प्रतिष्ठित शेतकरी व लोकमित्र रमेश यशवंत हिंदुराव यांनी मुरबाडचे तहसीलदार, ठाणे जिल्हाधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. हस्त नक्षत्राने फिरवली पाठ; हातातोंडाशी आलेला घास हिरावला मुरबाड तालुक्यात प्रामुख्याने भात शेती केली जाते. यंदा पिके उत्तम स्थितीत असतानाच, ऐन परिपक्वतेच्या काळात म्हणजेच 'हस्त नक्षत्रात' पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली. महिनाभरापासून कडक ऊन आणि पाण्याचा थेंबही नसल्याने उभी भात पिके सुकून गेली आहेत. वर्षभराची मेहनत आणि लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाल्याने तालुक्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. न्हावे परिसरातील शेतकरी श्री. शिवाजी चिमजी हिंदुराव, श्री. भगवान दामोदर हिंदुराव, अनंत रोकडे, काशिनाथ हिंदुराव यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या शेतांची अवस्था दयनीय झाली आहे. प्रत्यक्ष घाम गाळणाऱ्या शेतमजुरांनाही न्याय मिळावा! या निवेदनात एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. तालुक्यातील अनेक जमीनदार किंवा वृद्ध शेतकरी आपली जमीन इतर गरीब मजुरांना लाभापोटी (बटाईने किंवा कराराने) कसायला देतात. पिके जळून खाक झाल्यामुळे जमीन मालकांसोबतच या शेतमजुरांच्या कुटुंबांवरही उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने केवळ कागदोपत्री सातबारा धारकांचा विचार न करता, प्रत्यक्ष शेतात राबणाऱ्या भूमीहीन शेतमजुरांनाही नुकसानभरपाईचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी रमेश हिंदुराव यांनी केली आहे. प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू शेतकऱ्यांनी आपल्या करपलेल्या पिकांचे थेट फोटो पुराव्यादाखल अर्जासोबत जोडले आहेत. या निवेदनाची गंभीर दखल तहसीलदार कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने घेतली असून अर्जावर आवक-जावक शिक्के मारून पुढील कार्यवाहीसाठी संबंधित तलाठी (सज्जा मानिवली) यांच्याकडे निर्देश देण्यात आले आहेत. आता प्रशासन एसी केबिनमधून बाहेर पडून कधी प्रत्यक्ष बांधावर जाते आणि वरिष्ठ कार्यालयाकडे पंचनाम्याचा अहवाल सादर करते, याकडे संपूर्ण मुरबाड तालुक्यातील बळीराजाचे डोळे लागले आहेत.