🔥 TRENDING જંબુસરના નોંધણા ગામમાં 10 દિવસની મહેનત... सरपंच चुनाव की खबर मनोहर सिंह भाटी ने बताया વાગરા ખાતે 'બચ્ચો કા ઘર' સમૂહ લગ્નોત્સ... Arunachal groups demand probe into roa... Act East Policy Boosts Growth in India...
16 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लोणीत ७० शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचांचे वाटप; जलसंधारणातून शेतीला नवी दिशा..!

✍️ Reporter: Surendra Uttam Sonawane 🗓 16 Nov 2026, 04:02 PM 👁 29
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

लुपिन फाउंडेशन व व्हर्लपूल कंपनीचा संयुक्त उपक्रम; कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन..!! सुरेंद्र सोनवणे, पुणे प्रतिनिधी | Need 24 News

लोणी (ता. आंबेगाव) : वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सिंचनासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने लोणी येथे ७० शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचांचे वाटप करण्यात आले. लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन, पुणे आणि इलिका पी. बी. व्हर्लपूल किचन अप्लायन्सेस प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘उपजीविका विकासासाठी जलसंसाधन प्रकल्पा’अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. प्रत्येक शेतकऱ्याला एक एकर क्षेत्रासाठी सिंचन संच देण्यात आल्याने कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यास मदत होणार आहे.

सध्या परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पाण्याचे योग्य नियोजन करणे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत तुषार सिंचन पद्धतीमुळे पाण्याची बचत होऊन भाजीपाला तसेच इतर पिकांना कमी पाण्यात प्रभावी सिंचन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षात लोणी गावात आठ सिमेंट बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. याशिवाय गावातील तीन पाझर तलावांमधील गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळा, लोणी आणि उपबाजार समिती मंचर बाजार आवार, लोणी येथे रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामेही करण्यात आली आहेत. या जलसंधारणाच्या उपक्रमांमुळे पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यास तसेच भूजल पातळी वाढविण्यास हातभार लागत आहे.

तुषार सिंचन संच वितरण कार्यक्रमास लोणी गावचे सरपंच सावळाराम नाईक, शरद बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, माजी सरपंच उद्धव लंके, जारकरवाडी पंचायत समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बाळशिराम वाळुंज, उपसरपंच राजेंद्र वाळुंज, पोलीस पाटील संदीप आढाव, भैरवनाथ विद्याधाम लोणीचे शिक्षण समिती सदस्य संतोष पडवळ, रमेश खोमणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी लुपिन फाउंडेशनचे तालुका व्यवस्थापक प्रताप मोटे यांनी तुषार सिंचन संचांचा वापर करून भाजीपाला पिकांना योग्य पद्धतीने पाणी देणे आणि कमी पाण्यात अधिक उत्पादन कसे घेता येईल, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. फिनोलेक्सचे रोहित कदम यांनी सिंचन संचांची जोडणी, पाण्याचे नियोजन आणि प्रत्यक्ष वापर याविषयी सविस्तर माहिती दिली. लुपिन फाउंडेशनचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी बाळासाहेब बोऱ्हाडे व मच्छिंद्र खरात यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांच्या वतीने उपस्थित अधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. बाळशिराम वाळुंज यांनी उपस्थित मान्यवर व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

जलसंधारण, आधुनिक सिंचन तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून लोणी गावात शेतीच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
📲Get App