🔥 TRENDING Driver of Speeding Scorpio Kills Pilgr... ManoramaMAX to Debut "Abhirami" Film a... New OTT Releases This Week: Shaque, Do... Rise and Fall 2 Announces Contestant L... SS Rajamouli unveils trailer of ‘Sigma... Ajay Devgn’s ‘Drishyam 3’ retitled ‘Dr...
22 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
लांजा: कुवे येथे बहुउद्देशीय सभागृह व नगरपंचायत कार्यालयाचे उद्घाटन; विकासकामांची जबाबदारी माझी - आमदार किरण सामंत
Local

लांजा: कुवे येथे बहुउद्देशीय सभागृह व नगरपंचायत कार्यालयाचे उद्घाटन; विकासकामांची जबाबदारी माझी - आमदार किरण सामंत

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 06 Sep 2026, 01:28 PM 👁 34
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

लांजा तालुक्यातील कुवे येथे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन आणि नगरपंचायत कार्यालयाचा शुभारंभ उत्साहात पार पडला.

लांजा तालुक्यातील कुवे गावाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याच्या दृष्टीने विविध विकासकामांना चालना देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कुवे येथे उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन तसेच नगरपंचायत कार्यालयाचा शुभारंभ आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. ६ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमाला कुवे परिसरातील नागरिक, नगरपंचायत पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुवे परिसरातील नागरिकांना विविध शासकीय व प्रशासकीय कामांसाठी वारंवार लांजा येथे जावे लागू नये आणि स्थानिक पातळीवरच आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हे नगरपंचायत कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या दैनंदिन समस्या, रस्ते, पाणी, स्वच्छता, गटारे, पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांना अधिक वेगाने प्रतिसाद मिळण्यास मदत होणार आहे. तसेच, नवीन बहुउद्देशीय सभागृहामुळे ग्रामस्थांना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम, महिला बचतगटांच्या बैठका आणि शासकीय जनजागृती उपक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे.

यावेळी कुवेच्या विकासाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार किरण सामंत म्हणाले, "कुवेवासीयांचे कोणतेही काम थांबणार नाही. नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि विकासकामे मार्गी लावणे ही आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे. कुवेच्या विकासासाठी आवश्यक असलेली सर्व कामे प्राधान्याने आणि टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील." कुवेचा विकास हा केवळ रस्ते व इमारतींपुरता मर्यादित नसून, येथील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हा त्यामागील व्यापक उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर, गटनेते योगेश कावतकर, बांधकाम सभापती वैभव जोईल, पाणी सभापती रफिक (गुल्ल्या) नेवरेकर, महिला व बालकल्याण सभापती प्रणाली तेली, प्रणिता बोडस, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी, जमीनमालक राडये कुटुंबीय आणि कुवेवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📲Get App