🔥 TRENDING फत्तेपूर ग्रामसेवक गैरहजर; ग्रामस्थांच... જૂનાગઢ: ગૌચર દબાણ મામલે કાર્યવાહી નહીં... લાઠી નજીક ટોડા ગામે બે મોટરસાયકલ વચ્ચે... Star Arjun's Digital Avatar 'Raka' Set... Storm warning prompts school closures... NTPC Green commissions 56.7 MW of wind...
23 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

जामनेर हादरले! CBI अधिकारी बनून सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याला २३ लाख ४० हजारांचा ऑनलाईन गंडा, गोल्ड लोन घेऊन पैसे भरायला लावले

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 23 Sep 2026, 10:44 AM 👁 12
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

जामनेर : तुमच्या नावावर असलेल्या खात्यातून मानवी तस्करी आणि मनी लाँड्रिंगसाठी ३ कोटी रुपये काढले आहेत, अटक टाळायची असेल तर पैसे परत करा, अशी धमकी देऊन सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याची तब्बल २३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना १० ऑक्टोबर २०२५ ते १५ सप्टेंबर दरम्यान घडली आहे. फसवणूक करणाऱ्यांच्या भीतीने या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने सोने तारण कर्ज घेऊन पैसे भरल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फसवणूक झालेले माणिक मारुती घुले (वय ७२, रा. जामनेर) हे स्टेट बँक ऑफ इंडियामधून सेवानिवृत्त झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना १५ ऑक्टोबर २०२५ रोजी एक व्हिडिओ कॉल आला होता. कॉलवर समोर खाकी वर्दीतील व्यक्ती होती, जिने स्वतःला दिल्ली CBI चा अधिकारी असल्याचे सांगितले.

सदाकत खान नावाच्या आंतरराष्ट्रीय फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने तुमच्या आधारकार्डचा गैरवापर करून तुमच्या नावाने सिमकार्ड आणि बँक खाते उघडले आहे. त्या खात्यातून मानवी तस्करीसाठी ३ कोटींचा व्यवहार झाला आहे, असे भासवून त्यांना घाबरवण्यात आले. तसेच तुमच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात मनी लाँड्रिंगचा खटला सुरू आहे, लवकरच अटक वॉरंट निघेल, तुमची मालमत्ता सील होईल आणि पोलिसांची गाडी थेट घरी येईल, अशा धमक्या देण्यात आल्या.

या भीतीपोटी भामट्यांनी घुले आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांची व मालमत्तेची संपूर्ण माहिती मिळवली. त्यावेळी घुले यांच्या खात्यात असलेले ३ लाख ५० हजार रुपये पहिल्यांदा घेण्यात आले. त्यानंतरही वेगवेगळी कारणे सांगून त्यांना सतत धमकावून पैसे जमा करण्यास भाग पाडले.

घाबरलेल्या घुले यांनी ७ लाख ५० हजार रुपयांचे गोल्ड लोन घेतले आणि ओव्हरड्राफ्ट बंद करून मिळालेले ३ लाख ५० हजार रुपये असे एकूण ११ लाख रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यावर पाठवले. तरीही आरोपींनी व्हिडिओ कॉल करून धमकावणे सुरूच ठेवले.

हे पैसे RBI कडून परत मिळतील आणि मनी लाँड्रिंगचा फंड परत केला तर कारवाई टळेल, असे सांगून त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने एकूण २३ लाख ४० हजार ७० रुपये उकळण्यात आले. पैसे भरूनही परतावा मिळत नसल्याने आणि 'निल सर्टिफिकेट' व धनादेश पोलिस ठाण्यातून मिळेल असे सांगून टाळाटाळ होत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे घुले यांच्या लक्षात आले.

अखेर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून स्वतःची नावे किर्ती सन्याल, दीपक शर्मा आणि रवी कुमार असल्याचे सांगणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
📲Get App