🔥 ट्रेंडिंग सिंगरौली में मरीज के लिए एंबुलेंस बनी... उत्तर प्रदेश के सीएम योगी ने कहा, एसपी... मनोहर सिंह भाटी ने बताया राजस्थान में आरएएस भर्ती परीक्षा अब हर... पल्जोर स्टेडियम में शुरू हुआ 49वां जून... मनोहर सिंह भाटी ने बताया बेदु कला से
15 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

गडचिरोली–चंद्रपूर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

✍️ रिपोर्टर: DOCTOR PINTU PAUL 🗓 15 नव. 2026, 04:59 PM 👁 28
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

राष्ट्रीय महामार्ग NH-930 ची दुरवस्था! गडचिरोली–चंद्रपूर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; अजयपूर येथील अंधेरी नदीचा जुना पूलही धोकादायक, प्रशासन आणखी किती बळींची वाट पाहणार

राष्ट्रीय महामार्ग NH-930 ची दुरवस्था! गडचिरोली–चंद्रपूर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; अजयपूर येथील अंधेरी नदीचा जुना पूलही धोकादायक, प्रशासन आणखी किती बळींची वाट पाहणार?
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग NH-930 ची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, गडचिरोली ते चंद्रपूर मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाली असून, या मार्गावर अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. खराब रस्त्यामुळे वाहनचालक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
विशेषतः चिचपल्ली गावातील पेट्रोल पंपाजवळ तसेच दारूभट्टी परिसरात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अरुंद रस्ता आणि खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना सुरक्षितपणे जाण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध होत नाही. या परिसरात वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अजयपूर येथील अंधेरी नदीचा जुना पूल धोकादायक?
दुसरीकडे, अजयपूर गावाजवळील अंधेरी नदीवरील जुन्या पुलाची अवस्थाही चिंताजनक असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. सध्या या जुन्या पुलावरून अवजड वाहने आणि गाड्यांची वाहतूक सुरू आहे. पुलाची सद्यस्थिती पाहता तो कमकुवत होऊन कोसळण्याची शक्यता असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे या पुलाची तातडीने तांत्रिक तपासणी करून सुरक्षिततेबाबत स्पष्टता देणे आवश्यक आहे.
या पुलाच्या कामासाठीच तीन ते चार वर्षांचा कालावधी लागत असेल, तर संपूर्ण राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती आणि बांधकाम पूर्ण होण्यासाठी आणखी किती वर्षे लागणार? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि PWD प्रशासनाचे दुर्लक्ष का?
राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), गडचिरोली यांच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्त्याची दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि अजयपूर येथील जुन्या पुलाचा सुरक्षेचा प्रश्न याकडे संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी गांभीर्याने लक्ष देणार तरी कधी?
एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का? अपघात टाळण्यासाठी आधीच उपाययोजना करणे ही संबंधित विभागांची जबाबदारी नाही का?
नागरिकांचा प्रशासनाला थेट सवाल!
गडचिरोली–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गाची तातडीने पाहणी करून मोठमोठे खड्डे बुजवावेत, चिचपल्ली परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करावी, अजयपूर येथील अंधेरी नदीवरील जुन्या पुलाची तज्ज्ञांकडून तांत्रिक तपासणी करावी आणि पुलाच्या सुरक्षिततेबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आता नागरिकांनी आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी आंदोलन करावे का? प्रशासनाला जागे करण्यासाठी आणखी किती अपघातांची आणि निष्पाप नागरिकांच्या जीवितहानीची वाट पाहावी लागणार?
राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि PWD प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि ठोस कार्यवाही करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
प्रश्न एकच — सुरक्षित रस्ते आणि सुरक्षित पूल मिळणे हा नागरिकांचा अधिकार नाही का?
📲Get App