🔥 ट्रेंडिंग लालू प्रसाद यादव, राबड़ी देवी और रोहिण... बरूहातू पंचायत भवन में बिजली समस्या नि... कमलपुर के प्राथमिक स्कूल में मध्याह्न... ದೇವದುರ್ಗದಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಜಯಂತಿ ಸಂ... वाराणसी: चेतगंज पुलिस ने गुमशुदा बालक... उजियारा अभियान में कोरर पुलिस ने बाड़ी...
20 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
देश

श्री संत मट्टू महाराज संस्थान, कोठा (वेणी) येथे २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन भव्य श्री संत मेळावा, काला व वारकरी दिंडी स्पर्धेसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

✍️ रिपोर्टर: SUSHIL RAMESH HATWAR 🗓 20 नव. 2026, 01:15 PM 👁 35
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :- सुशील हटवार

श्री संत मट्टू महाराज संस्थान, कोठा (वेणी) येथे २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन

भव्य श्री संत मेळावा, काला व वारकरी दिंडी स्पर्धेसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :- सुशील हटवार
कोठा (वेणी), ता. कळंब, जि. यवतमाळ :

श्री संत मट्टू महाराज संस्थान, कोठा (वेणी), ता. कळंब, जि. यवतमाळ यांच्या वतीने श्री संत मट्टू मालक महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर ते शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये भव्य श्री संत मेळावा, काला, वारकरी दिंडी स्पर्धा, कीर्तन, पालखी मिरवणूक, दहीहंडी, महाप्रसाद तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

या चार दिवसीय महोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा, वारकरी संप्रदायाची भक्तीभावना, संत विचारांचा प्रसार आणि सामाजिक एकोपा जपण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे. या सोहळ्यास परिसरातील तसेच जिल्हाभरातील भाविक, वारकरी, संत-महंत, भजनी मंडळे आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थान व आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

चार दिवसांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

१) मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ – भव्य ऑर्केस्ट्रा

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत भव्य ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नामवंत भालदार कलाकार ह.भ.प. श्री संतोष महाराज भालेराव (लाठी सेलबाजार) तसेच ह.भ.प. श्री हरिभाऊ महाराज शिंदे (वाशीम) यांच्या मधुर वाणीतून संगीत आणि नादमय भक्तिरसाचा आनंद रसिकांना घेता येणार आहे.

२) बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ – भव्य संत मेळावा, कीर्तन व वारकरी दिंडी स्पर्धा

महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेल्या संत मेळाव्यासाठी विविध संत-महंतांची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये श्री दिवाकर महाराज (इचोरा फाटा), श्री प्रभाकरराव वानखेडे (हुसनापूर), सोनामाता (धनोडी), श्री संत बालयोगी अनंत महाराज (श्रीरामपूर, मु. कोठुली, ता. राळेगाव), संत बालयोगी ऋषिकेश महाराज (वाघोडा, ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती) आदींची उपस्थिती राहणार आहे.

या दिवशी दुपारी १२ वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून, दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत वारकरी दिंडी व पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता दहीहंडीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर लगेचच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच ह.भ.प. श्री लक्ष्मणराव तराळ महाराज (कापरा) यांच्या काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून, कोठा येथील वारकरी भजनी मंडळ व गुरुदेव सेवा मंडळ यांची साथ लाभणार आहे.

वारकरी दिंडी स्पर्धेचे विशेष आकर्षण :

बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक दिंडीला नारळ, पान व १,००१ रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दिंडी स्पर्धकांनी बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता उपस्थित राहावे. दिंडीची नोंदणी सकाळी ९ वाजेपर्यंत संस्थानात करणे आवश्यक आहे. दिंडीमध्ये किमान १० ते १५ व्यक्ती असणे आवश्यक आहे, असे आयोजकांनी कळविले आहे.

३) गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ – बाल कीर्तन सोहळा

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत बाल कीर्तनकार ह.भ.प. देवांनंद महाराज सोनवणे, यवतमाळ यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या कीर्तनातून भक्ती, संस्कार, संत विचार आणि वारकरी परंपरेचे महत्त्व भाविकांना अनुभवता येणार आहे.

४) शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ – सांस्कृतिक नाट्यप्रयोग

महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी बहुउद्देशीय ज्ञानदीप कला मंडळ, कळंब प्रस्तुत 'लावणी प्रधान दोन अंकी नाटक – शापित गर्भ' हा नाट्यप्रयोग सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सादर करण्यात येणार आहे.

संतविचार, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा संदेश

श्री संत मट्टू मालक महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा यात्रा महोत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारा, संतांच्या विचारांचा प्रसार करणारा आणि समाजातील बंधुभाव अधिक दृढ करणारा उपक्रम आहे. या निमित्ताने विविध गावांतील दिंड्या, पालख्या, भजनी मंडळे आणि वारकरी एकत्र येऊन भक्तिमय वातावरण निर्माण करणार आहेत.

या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ परिसरातील सर्व भाविक भक्तांनी घ्यावा. तसेच पालखी व दिंडी प्रमुखांनी आपल्या दिंडीसह वेळेत उपस्थित राहून स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आयोजक :
श्री संत मट्टू मालक संस्थान, कोठा (वेणी)
गावकरी भक्त पंच कमिटी, कोठा (वेणी)
वारकरी भजनी मंडळ, कोठा (वेणी)

संपर्क : श्री संत मट्टू मालक संस्थान, कोठा (वेणी).

टीप : सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा व यात्रा महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.

— जनसामान्यांचा आवाज, युवा संघर्ष न्यूज —
📲Get App