🔥 TRENDING Actor Lakshmipriya Booked Over Alleged... Bank Unions Postpone Nationwide Strike... Amar Ujala Releases Daily News Bulleti... UK Detains 5 Over Alleged Plot to Atta... Ambajogai Housebreak: Two Arrested wit... 11 Arrested for Mobile Theft During Pu...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

प्रज्वल घडशी मृत्यू प्रकरण: कारवाई न झाल्यास मुंबई-गोवा महामार्ग रोखण्याचा बहुजन विकास आघाडीचा इशारा

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 26 Sep 2026, 01:34 PM 👁 71
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गणपती विसर्जनावेळी सोनवी नदीपात्रातील खोल खड्ड्यात बुडून प्रज्वल घडशी यांच्या मृत्यूस पाच दिवस उलटले तरी महामार्ग ठेकेदारावर कारवाई नाही. बहुजन विकास आघाडीने तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

संगमेश्वर: गणपती विसर्जनासाठी सोनवी नदीपात्रात उतरलेल्या प्रज्वल पुरुषोत्तम घडशी (रा. माभळे) यांचा नदीपात्रात तयार झालेल्या खोल खड्ड्यात बुडून मृत्यू होऊन पाच दिवस उलटले आहेत. मात्र, या प्रकरणात संबंधित महामार्ग ठेकेदारावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने बहुजन विकास आघाडीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा प्रसंगी मुंबई-गोवा महामार्ग रोखण्याचा इशारा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांनी दिला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी सोनवी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात गाळ काढून त्याचा महामार्गाच्या भरावासाठी वापर करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. गणपती विसर्जन घाटालगत सुमारे २५ ते ३० फूट खोल खड्डे निर्माण झाले होते. हे खड्डे बुजविण्याची मागणी ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाकडे वारंवार केली होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यानेच प्रज्वल घडशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे.

प्रज्वल यांच्या मृत्यूनंतर बहुजन विकास आघाडीने संगमेश्वर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, पाच दिवस उलटूनही पोलिसांकडून संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान, प्रज्वल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाच दिवसांत योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, पाचवा दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. उद्या संबंधित अधिकारी आपले म्हणणे सादर करणार असल्याची माहिती प्रज्वल यांचे आजोबा गुणाजी घडशी यांनी दिली.

“प्रज्वलच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई होणे आवश्यक आहे. प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यास बहुजन विकास आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. प्रसंगी महामार्ग रोको करण्यात येईल,” असा इशारा सुरेश भायजे यांनी दिला. संगमेश्वर पोलीस ठाण्यात निवेदन देताना बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे, दिलीप चौगुले (लांजा), विलास डिके (चिपळूण), संतोष चांदे (कसबा), दत्ताराम लांबे (आरवली), सुनील भुवड, दीपक शिंगण, गणपत गोटेकर आदी उपस्थित होते.
📲Get App