🔥 TRENDING जमुआ फुलवारी में पूर्व वार्ड 13 सदस्य... बदायूं जिले के तहसील बिल्सी में ग्राम... मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव शहडोल जिले म... जैसिंगपुर में सड़क दुर्घटना એપલનું આઇફોન 18, એમ4 મેકબુક અને એપલ ઇન... Headlines
24 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

मुरबाड खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर; भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना पुन्हा संधी की नव्या चेहऱ्यांना पसंती? शेतकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा!

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 24 Oct 2026, 12:17 PM 👁 20
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४ न्यूज वृत्तसेवा
जिल्हा रिपोर्टर: काशिनाथ देसले, ठाणे
तालुका रिपोर्टर: किशोर पवार, मुरबाड
दिनांक: २४/१०/२०२६

मुरबाड खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर; भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना पुन्हा संधी की नव्या चेहऱ्यांना पसंती? शेतकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा!

मुरबाड:
मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाच्या सन २०२६-२०२७ ते २०३०-२०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, यामुळे मुरबाडच्या सहकार क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. संघाच्या कारभारावर यापूर्वी विविध भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्याची पार्श्वभूमी असताना, आता पुन्हा जुन्याच संचालकांना संधी मिळणार की तालुका बदल घडवून आणत नव्या चेहऱ्यांना पसंती देणार, याबाबत शेतकरी वर्गात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या जुन्या नेतृत्वाला शेतकरी कौल देणार का, हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती नेहा कांदेकर यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ च्या नियम १९ नुसार हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

१५ जागांसाठीचे जागावाटप कसे आहे?

या निवडणुकीत एकूण १५ जागांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये विविध प्रवर्गातील प्रतिनिधींचा समावेश आहे:
• सर्वसाधारण सहकारी संस्था प्रतिनिधी: १० जागा
• महिला राखीव प्रवर्ग: २ जागा
• इतर मागास प्रवर्ग (OBC): १ जागा
• अनुसूचित जाती/जमाती प्रवर्ग (SC/ST): १ जागा
• विमुक्त जाती/भटक्या जमाती प्रवर्ग (VJ/NT): १ जागा

निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक:

• नामनिर्देशन (उमेदवारी अर्ज) दाखल करणे: १९ ते २६ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत)
• उमेदवारी अर्जांची छाननी: २७ ऑक्टोबर २०२६
• वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे: २८ ऑक्टोबर २०२६
• उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत: १२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत
• चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी: १३ नोव्हेंबर २०२६
• मतदान आणि मतमोजणी: २५ नोव्हेंबर २०२६ (मतदान सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी ४:३० नंतर मतमोजणी सुरू होऊन निकाल घोषित केले जातील.)

राजकीय प्रतिष्ठा पणाला; पवार विरुद्ध कथोरे संघटित लढत?

या निवडणुकीचे सर्वाधिक राजकीय आकर्षण म्हणजे भाजपचे आमदार किसन कथोरे आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाषदादा पवार यांची भूमिका काय असणार, हा आहे. हे दोन्ही नेते या निवडणुकीत आमनेसामने येणार की एकत्रितपणे निवडणूक लढविणार, याकडे संपूर्ण मुरबाड तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघावर गेल्या अनेक वर्षांपासून माजी आमदार गोटीराम भाऊ पवार यांच्या गटाचे वर्चस्व राहिले होते. मात्र, कालंतराने या वर्चस्वाला आव्हान देत आमदार किसन कथोरे यांनी खरेदी-विक्री संघावर आपले राजकीय वर्चस्व निर्माण केले. सध्या सुभाषदादा पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि समर्थकांची ताकद दाखवण्यासाठी ते कोणती राजकीय खेळी खेळतात, याकडे राजकीय जाणकारांचे बारीक लक्ष आहे.

शेतकऱ्यांचे हित की राजकीय वर्चस्व?

दरम्यान, शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या या सहकारी संस्थेच्या निवडणुकीत केवळ राजकीय वर्चस्वाची लढाई न होता, संघाचा कारभार, आर्थिक पारदर्शकता, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि मागील संचालक मंडळाच्या कामगिरीचा हिशोब या गोष्टी केंद्रस्थानी येणे गरजेचे असल्याचे मत सामान्य शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
संघाच्या कारभारावर झालेल्या आरोपांची वस्तुनिष्ठ चौकशी, आर्थिक व्यवहारांमधील पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणारे नेतृत्व मुरबाडला मिळणार का, हाच खरा मुख्य प्रश्न आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या जुन्या संचालकांना पुन्हा संधी मिळणार की नव्या चेहऱ्यांच्या माध्यमातून परिवर्तन घडणार? राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरणार की शेतकऱ्यांच्या हिताचा नवा अध्याय सुरू होणार, याचे उत्तर आगामी २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानातून स्पष्ट होईल. सध्या तरी या निवडणुकीमुळे मुरबाड तालुक्यातील शेतकरी आणि सहकार क्षेत्राचे वातावरण पूर्णपणे तापले आहे.
📲Get App