🔥 TRENDING Jailer 2 (Hindi) Nets ₹3.75 Cr in Thir... Amit Sadh Highlights Social Media Pres... Tamil Nadu Day: Tamil Semmal Awards Co... CM MK Stalin slams Vijay government ov... Madhya Pradesh Police Officer Killed A... Four Indian States Raise Dearness Allo...
02 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

वरणगाव बायपासवर तरुणावर प्राणघातक हल्ला; लोखंडी रॉडने मारहाण, गावठी कट्ट्यातून गोळीबार...!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 02 Nov 2026, 03:49 PM 👁 8
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

वरणगाव : फुलगाव उड्डाणपुलाखालील बायपास रस्त्यावर रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास २५ वर्षीय तरुणावर अज्ञात तिघांनी जीवघेणा हल्ला केला. लोखंडी रॉडने डोक्यात घाव घालून गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडण्यात आल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे.

जखमी तरुणाचे नाव सरफराज सय्यद बशीर सय्यद (वय २५, रा. मुक्ताईनगर) असे आहे. तो भुसावळ येथील व्यावसायिक बी. एन. अग्रवाल यांच्याकडे चालक म्हणून कामाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, रविवारी काम आटोपून सरफराज दुचाकीवरून मुक्ताईनगरकडे निघाला होता. वाटेत त्याला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यानंतर त्याने पुलावरून न जाता पुलाखालील बायपास रस्त्याची वाट धरली. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या दुचाकीवरील तिघांनी त्याची दुचाकी अडवली.

हल्लेखोरांनी प्रथम त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केला. तो खाली कोसळल्यानंतर त्याच्या दिशेने गावठी कट्ट्यातून दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी एक गोळी त्याच्या खांद्याला लागली. रक्तबंबाळ अवस्थेत तो रस्त्यावर कोसळला. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी अंधाराचा फायदा घेऊन दुचाकीवरून पसार झाले.

गोळीबाराची वार्ता पसरताच वरणगाव परिसरात घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी सरफराज याला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फरार झालेल्या तिन्ही हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात नाकेबंदी केली असून, पुढील तपास सुरू आहे.
📲Get App