🔥 TRENDING 'ਮੇਰੀ ਦੋਸਤ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਬਾਰੇ...' ਬਾਡੀਗ... લીલીયાના ઈંગોરાળા ગામે પતિએ પત્નીને મા... गढ़वा के भंडरिया में विशेष छापामारी, 1... ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ DBR ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕ್ರೀ... விருதுநகரில் நள்ளிரவு கொடூரம்: 82 வயது... 'ਸਿੱਖੋ, ਪੰਜਾਬ ਨਾਲੋਂ ਆਪਣੀਆਂ ਜੜ੍ਹਾਂ ਕਦੇ...
01 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Lifestyle

उल्हास नदीच्या विकासासाठी मास्टर प्लॅन तयार; अत्याधुनिक ड्रोनद्वारे सर्वेक्षणाला सुरुवात.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 01 Nov 2026, 01:12 PM 👁 20
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४न्यूज महाराष्ट्र
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
मुरबाड विशेष वृत्त :
उल्हास नदीच्या विकासासाठी मास्टर प्लॅन तयार; अत्याधुनिक ड्रोनद्वारे सर्वेक्षणाला सुरुवात.
उल्हास नदीच्या विकासासाठी मास्टर प्लॅन तयार; अत्याधुनिक ड्रोनद्वारे सर्वेक्षणाला सुरुवात
जिल्हा प्रतिनिधी नीड २४न्यूज महाराष्ट्र काशिनाथ देसले ठाणे
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड दिनांक १/११/२०२६
ठाणे मुरबाड (प्रतिनिधी) -
उल्हास नदीचे प्रदूषण रोखणे, पात्राचे सौंदर्यीकरण करणे आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने पावले उचलली आहेत. उल्हास नदीच्या सर्वांगीण विकासासाठी एक विशेष 'मास्टर प्लॅन' (विकास आराखडा) तयार करण्यात आला असून, अत्याधुनिक ड्रोन आणि हायड्रोग्राफिक (बाथमेट्री) उपकरणांच्या साहाय्याने प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.
नदीपात्राचा सखोल अभ्यास करून विकास आराखडा अधिक अचूक आणि प्रभावी करण्यासाठी या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
नदीपात्राची अचूक खोली मोजण्यासाठी आणि पात्राचा त्रिमितीय (3D) नकाशा तयार करण्यासाठी विशेष डिजिटल डीजीपीएस (DGPS) यंत्रणा आणि पाण्यावर चालणारे हायड्रोग्राफिक ड्रोन (USV) तैनात करण्यात आले आहेत. या उपकरणांच्या साहाय्याने नदीच्या पात्रातील गाळ, खोली आणि रचनेचा सविस्तर डिजिटल डेटा गोळा केला जात आहे.
३ किमी क्षेत्राचे डिजिटल मॅपिंग
या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात बदलापूर परिसरातील अंदाजे ३ किलोमीटर लांबीच्या नदीपात्राचे आणि त्याभोवती असलेल्या ७.३ चौरस किलोमीटर परिसराचे संपूर्ण डिजिटल मॅपिंग केले जात आहे.
सर्वेक्षणाची मुख्य उद्दिष्टे:
• पूर नियंत्रण नियोजन: पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे शहरात होणारे नुकसान टाळण्यासाठी नदीच्या प्रवाह क्षमतेचा अभ्यास करणे.
• प्रदूषण मुक्ती: नदीपात्रात ज्या ज्या ठिकाणांहून सांडपाणी किंवा केमिकल मिश्रित पाणी सोडले जाते, ते प्रदूषणाचे स्त्रोत शोधून त्यावर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवणे.
• सौंदर्यीकरण आणि संवर्धन: नदीकाठ बळकट करणे, घाट बांधणे आणि नदीपात्र स्वच्छ ठेवून परिसराचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास करणे.
नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि अपेक्षा
या सर्वेक्षणाचे सोशल मीडियावर स्वागत होत असतानाच, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. एका सजग नागरिकाने कमेंट करत म्हटले आहे की, "हा प्रशासनाचा अतिशय स्तुत्य आणि छान उपक्रम आहे. परंतु, या प्रकल्पासाठी जो काही निधी आणि पैसा खर्च केला जाणार आहे, त्याचा योग्य वापर व्हावा आणि नदी खरोखरच प्रदूषणमुक्त व्हावी."
प्रशासनाने सुरू केलेल्या या अत्याधुनिक सर्वेक्षणामुळे आता वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला उल्हास नदीच्या पुनरुज्जीवनाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न सुटणार का, याकडे बदलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
📲Get App