🔥 ट्रेंडिंग रेगिना कैसेंड्रा ने कहा कि करन जौहर की... दक्षिणी सिनेमा का रिकॉर्ड वर्ष: बॉक्स... रेगिना कैसेंड्रा ने कहा कि करन जौहर ने... राजकोट में अरुणाचल U19 महिलाएं बनाम सि... राजकोट में अरुणाचल के U19 महिला टीम का... अरुणाचल के मुख्यमंत्री ने 35वें वरिष्ठ...
05 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मनोरंजन

तमाशा कलेला नवसंजीवनी देण्यासाठी रामदास राऊत यांचा पुढाकार; तमाशा कलावंतांच्या हक्कांसाठी विशेष प्रयत्न करणार!

✍️ रिपोर्टर: Anil Mallav 🗓 05 नव. 2026, 09:44 PM 👁 14
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

तमाशा क्षेत्राची सद्यस्थिती सुधारावी, कलावंतांना योग्य सन्मान मिळावा आणि त्यांच्या मूलभूत समस्या मार्गी लागाव्यात

तमाशा कलेला नवसंजीवनी देण्यासाठी रामदास राऊत यांचा पुढाकार; तमाशा कलावंतांच्या हक्कांसाठी विशेष प्रयत्न करणार!

शिरूर प्रतिनिधी : 5 नोव्हेंबर 2026

महाराष्ट्राची समृद्ध लोककला आणि ग्रामीण संस्कृतीचा महत्त्वाचा वारसा असलेल्या तमाशा कलेला पुन्हा एकदा वैभवाचे दिवस आणण्यासाठी शिरूर येथील तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते मा. रामदासजी राऊत सर यांनी पुढाकार घेण्याचा संकल्प केला आहे. तमाशा क्षेत्राची सद्यस्थिती सुधारावी, कलावंतांना योग्य सन्मान मिळावा आणि त्यांच्या मूलभूत समस्या मार्गी लागाव्यात, यासाठी ते विशेष प्रयत्न करणार आहेत.

सध्याच्या काळात तमाशा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची तसेच या पारंपरिक लोककलेला प्रोत्साहन देण्याची नितांत गरज आहे. तमाशा ही केवळ मनोरंजनाची कला नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे तमाशा कलाप्रेमींनी या कलेकडे अधिक लक्ष देऊन कलावंतांना आर्थिक व सामाजिक बळ देणे आवश्यक आहे.

तमाशा आणि लोककलेच्या संवर्धनासाठी डॉ. प्रकाश खाडंगेसर, मा. बाबाजी कोरडेसर, मा. संजय नलावडेसर, मा. अरुण खरातसर, डॉ. गणेश चंदनशिवेसर, मा. खंडूराज गायकवाडसर, डॉ. पार्लेकरसर, डॉ. संतोष खेडलेकरसर तसेच सांस्कृतिक लोककला महोत्सव बेल्हे येथील मा. वसंतराव जगताप उर्फ अण्णा, त्यांचे सर्व सहकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ सातत्याने प्रयत्नशील आहेत.

त्याचप्रमाणे मा. पापाभाई बोरगावकर, मा. मुरलीमामा शिंदे बोरगावकर, राजेंद्र डी. मोरे सर, बारामतीचे शाहीर खंदारे सर, नेवासा येथील वगनाट्य लेखक आणि त्यांचे सहकारी, तसेच नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील नाथा मास्तर यांचे चिरंजीव सुधीर वैरागर यांच्यासह अनेक मान्यवर कलावंतांना प्रोत्साहन देत आहेत. या सर्वांच्या योगदानामुळे महाराष्ट्रातील तमाशा कला आजही जिवंत आहे. तमाशा कलावंत आणि फडमालक यांचे योगदान निश्चितच अनमोल आहे.

कलावंतांच्या मूलभूत प्रश्नांसाठी राऊत सरांचा संकल्प

तमाशा क्षेत्रात अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी कलावंत आजही आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. काही कलावंतांना नियमित मानधन मिळत नाही, काहींची आधारकार्ड नोंदणी झालेली नाही, तर अनेक कलावंतांकडे स्वतःचे हक्काचे घर नाही. अशा दुर्लक्षित कलावंतांच्या समस्या समजून घेऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच स्वतःचे घरकुल उपलब्ध व्हावे यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्धार रामदासजी राऊत यांनी व्यक्त केला आहे.

तृप्ती फिल्म प्रोडक्शन, शिरूरच्या माध्यमातून तमाशा क्षेत्रातील ज्ञात-अज्ञात कलावंतांना मदत, मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. जे जे शक्य आहे ते मनापासून करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

तमाशा कलेचे संवर्धन, कलावंतांचा सन्मान आणि त्यांच्या जीवनाला स्थैर्य मिळवून देणे हेच या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राच्या लोककलेचा हा अमूल्य ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा आणि तमाशा कलावंतांना सन्मानाने जगता यावे, यासाठी रामदास राऊत सरांचा हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद ठरणार आहे.
📲Get App