🔥 TRENDING Bank unions postpone three‑day nationw... Uttar Pradesh sugar production falls s... Baba Mahakal adorned with silver crown... Congress Reviews Local Body Election L... மின்கம்பம் சரிந்து ஐந்து வயது குழந்தை... कार्य
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
रायगडमध्ये पीएम विश्वकर्मा योजनेला उत्तम प्रतिसाद; पात्र कारागिरांपर्यंत लाभ पोहोचवण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
Sarkari Yojana

रायगडमध्ये पीएम विश्वकर्मा योजनेला उत्तम प्रतिसाद; पात्र कारागिरांपर्यंत लाभ पोहोचवण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 18 Sep 2026, 09:12 PM 👁 52
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रायगड जिल्ह्यात पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत १५,२७२ कारागिरांनी नोंदणी केली असून, ३,३८५ अर्ज मंजूर झाले आहेत. पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी प्रशासनाला पात्र कारागिरांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी अधिक गतिमानतेने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

रायगड जिल्ह्यात पंतप्रधान विश्वकर्मा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, पात्र असलेल्या प्रत्येक कारागिरापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी प्रशासनाने अधिक गतिमानतेने काम करावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले आहेत. पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वावलंबी व उद्योजक बनवण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबाग येथील नियोजन भवनात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, रायगडच्या वतीने आयोजित पीएम विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील एकूण ८०९ ग्रामपंचायतींपैकी ७८६ ग्रामपंचायती या योजनेच्या पोर्टलवर ऑनबोर्ड झाल्या असून, १५ हजार २७२ कारागिरांनी यामध्ये ऑनलाइन नोंदणी केली आहे. यातील ३ हजार ३८५ अर्ज मंजूर झाले असून, १ हजार ७९८ लाभार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तसेच, ९२३ कारागिरांना १५ हजार रुपयांचे टूलकिट देण्यात आले आहे. ही योजना सुतार, लोहार, कुंभार, विणकर, चर्मकार, नाभिक, धोबी, शिंपी आणि गवंडी यांसारख्या पारंपरिक व्यवसायातील घटकांना सन्मान, कौशल्यवृद्धी व आर्थिक बळ देणारी आहे.

मूलभूत प्रशिक्षणादरम्यान लाभार्थ्यांना दररोज ५०० रुपये विद्यावेतन आणि व्यवसायवाढीसाठी तारणमुक्त कर्जसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. प्रशासन आणि बँक प्रतिनिधींनी प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. उर्वरित २२ ग्रामपंचायतींचे ऑनबोर्डिंग लवकरात लवकर पूर्ण करावे आणि ज्यांचे प्रशिक्षण बाकी आहे अशा १ हजार ५८७ कारागिरांचे प्रशिक्षण तातडीने सुरू करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच, पात्र कारागिरांच्या कर्जप्रकरणांमध्ये विनाकारण विलंब न लावता त्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
📲Get App