🔥 TRENDING मीना से कचरा ना उठने की वजह से बना बाद... Kanak News Odisha Broadcasts Live Weat... Punjab Government to Mark Bhagat Singh... Four Men Booked for Harassment of Girl... "મન કી બાત પ્રાકૃતિક કૃષિ કે સાથ" India Records Fewer Road Crashes but R...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
रत्नागिरीतील नेपाळी खलाशी महापुराच्या तडाख्याने मायदेशी परतले; मासेमारी व्यवसायाला मोठा फटका
Business

रत्नागिरीतील नेपाळी खलाशी महापुराच्या तडाख्याने मायदेशी परतले; मासेमारी व्यवसायाला मोठा फटका

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 04 Sep 2026, 11:42 AM 👁 44
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
रत्नागिरी : नेपाळमध्ये आलेल्या महापूर आणि अतिवृष्टीमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायावरही जाणवू लागला असून, जिल्ह्यातील नौकांवर काम करणारे शेकडो नेपाळी खलाशी कुटुंबीयांच्या काळजीपोटी मायदेशी परतले आहेत. त्यामुळे मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच नौकामालकांसमोर मोठे मनुष्यबळाचे संकट उभे राहिले आहे.

गेल्या आठवड्यात नेपाळमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून, मोठ्या प्रमाणात नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. या परिस्थितीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारी करणाऱ्या नेपाळी खलाशांना आपल्या कुटुंबीयांची चिंता सतावू लागली. परिणामी अनेक खलाशी काम सोडून नेपाळकडे रवाना झाले आहेत.

रत्नागिरीतील मिरकरवाडा, राजीवडा, कासारवेली, काळबादेवी, पूर्णगड, जयगड, वरवडे, साखरीनाटे, हर्णे, दाभोळ, अंजनवेल यांसह अन्य बंदरांतील अनेक मासेमारी नौकांवर नेपाळी खलाशी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. काही नौकांवर तर बहुतांश खलाशी नेपाळी आहेत. त्यामुळे त्यांचे अचानक मायदेशी परतणे मासेमारी व्यवसायासाठी अडचणीचे ठरत आहे.

जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायात नेपाळी खलाशांचा मोठा सहभाग आहे. काही नौकांवर ७० ते ८० टक्क्यांपर्यंत खलाशी नेपाळी असल्याचे सांगितले जाते. स्थानिक तरुण या व्यवसायाकडे फारसे वळत नसल्याने नौकामालकांना परराज्यातील खलाशांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे नेपाळमधील परिस्थितीचा थेट परिणाम रत्नागिरीच्या मासेमारीवर होत आहे.

मासेमारी बंदीचा कालावधी संपल्यानंतर नौका समुद्रात जाण्यास सुरुवात होते. याच काळात मोठ्या प्रमाणात मासळी उपलब्ध होण्याची अपेक्षा असते. मात्र, खलाशांची कमतरता निर्माण झाल्याने अनेक नौकांच्या मासेमारी मोहिमा रखडण्याची शक्यता आहे. काही नौकामालकांनी खलाशांना परिस्थिती समजावून सांगत थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र कुटुंबीयांच्या सुरक्षिततेची चिंता असल्याने अनेकांनी मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला.

नेपाळमधील आपत्ती लवकर आटोक्यात न आल्यास त्याचा परिणाम रत्नागिरीतील मासेमारी हंगामावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नौकांवर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध न झाल्यास मासेमारी व्यवसायासह त्यावर अवलंबून असलेल्या इतर व्यवसायांनाही त्याचा फटका बसू शकतो.
📲Get App