🔥 ट्रेंडिंग केरल ने चावल खरीद दायित्व निपटाने के ल... तेलंगाना में इमा निजामाबाद ने डॉक्टरों... अदानी ने बताया, माइकल ब्लूमबर्ग की दृष... SEBI ने IPO इश्यू‑साइज़ छूट को 31 मार्... कनक न्यूज़ ओडिशा ने 13 अक्टूबर को दोपह... कनक न्यूज़ ओडिशा ने 13 अक्टूबर 2026 को...
14 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
प्रदीप पूर्णेकर हत्याकांड: माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पती राजेंद्र शिंदे यांची एसआयटीने केली सलग आठ तास कसून चौकशी
अपराध

प्रदीप पूर्णेकर हत्याकांड: माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पती राजेंद्र शिंदे यांची एसआयटीने केली सलग आठ तास कसून चौकशी

✍️ रिपोर्टर: Dr.Aniket Mestri 🗓 14 अक्टू. 2026, 10:40 AM 👁 20
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ठाण्यातील बहुचर्चित व्यावसायिक प्रदीप पूर्णेकर हत्याकांडात विशेष तपास पथकाने माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची सलग आठ तास चौकशी केली आहे. इतर आरोपींना प्रयागराजहून अटक केल्यानंतर प्रथमच शिंदे यांना थेट चौकशीसाठी पाचारण करण्यात आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

ठाणे : ठाण्यातील बहुचर्चित व्यावसायिक प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोठी कारवाई करत ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची सलग आठ तास कसून चौकशी केली आहे. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता चौकशीसाठी हजर झालेल्या राजेंद्र शिंदे यांच्यावर पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी रात्री साडेआठ वाजेपर्यंत प्रश्नांची सरबत्ती केली. पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी इतर संशयित आरोपी संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि अमित सिंह यांना शुक्रवारी प्रयागराज येथून बेड्या ठोकल्यानंतर प्रथमच शिंदे यांना थेट चौकशीसाठी पाचारण करण्यात आल्याने या प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण मिळाले आहे.

गेल्या २९ सप्टेंबरच्या रात्री पाच हल्लेखोरांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात बेधडक घुसून दोन पिस्तुलांतून गोळ्या झाडत आणि तीन चॉपरने सपासप वार करत त्यांची निर्घृण हत्या केली होती. या थरारक घटनेनंतर मयत पूर्णेकर यांचे बंधू तथा माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर आणि पुत्र राम पूर्णेकर यांनी पहिल्या दिवसापासूनच या हत्येमागे माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा थेट हात असल्याचा गंभीर संशय व्यक्त करत त्यांच्या अटकेची मागणी लावून धरली होती. नुकत्याच निघालेल्या सर्वपक्षीय मोर्चातही हीच मागणी जोर धरून होती, तर सोमवारी राम पूर्णेकर यांनी राजेंद्र शिंदे यांच्यावर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने पोलीस प्रशासनावरील दबाव प्रचंड वाढला होता.

वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर अखेर एसआयटीने राजेंद्र शिंदे यांना पाचारण करून इतर अटक आरोपींच्या उपस्थितीत समोरासमोर बसवून प्रश्नांचा भडिमार केला, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशीदरम्यान शिंदे यांनी अनेक थेट प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, पोलीस प्रशासनाने चौकशीसाठी बोलावल्याने आपण उपस्थित राहिलो असून तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करत आहोत, तसेच यापुढेही प्रत्येक चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे राजेंद्र शिंदे यांनी चौकशीनंतर स्पष्ट केले. दरम्यान, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील मूळ आरोपांबाबत ही सखोल चौकशी सुरू असून गुन्ह्यातील मुख्य आरोपींच्या संपर्कात असणाऱ्या प्रत्येक संशयित व्यक्तीला तपासासाठी पाचारण केले जाईल, असा सज्जड इशारा पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिला आहे.
📲Get App