🔥 ट्रेंडिंग తణుకు, ఇరగవరం, అత్తిలి ఎంపీటీసీ నామినే... અજાબના ખેડુતો પાક અને પશુધન માટે સહાયન... अंबिकापुर नगर सेना अधिकारी शिव कुमार क... राजस्थान में शुष्क मौसम के बीच चक्रवात... नोएडा के भंगेल सलारपुर में भट्ठा कालोन... हरियाणा ने शुरू किया मिशन सफलता, कक्षा...
27 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

पुणे विभागातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज अचूक आणि पारदर्शक मतमोजणीसाठी प्रशासनाचे नियोजन; अधिकारी-कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

✍️ रिपोर्टर: Surendra Uttam Sonawane 🗓 27 अक्टू. 2026, 08:39 AM 👁 31
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात ६२ टक्क्यांहून अधिक, तर पुणे शिक्षक मतदारसंघात ८२ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली होती. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठा पणाला लावली असून, आज २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, हे स्पष्ट होणार आहे.

सुरेंद्र सोनवणे, पुणे प्रतिनिधी | Need 24 News

पुणे : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून, नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने, अचूक आणि शांततेत मतमोजणी प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाला विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्यावर काटेकोर दक्षता घेण्याचे आवाहन करताना तेली-उगले म्हणाल्या की, मतपत्रिकांची वैध-अवैध वर्गवारी, पसंतीक्रमानुसार मतमोजणी, आवश्यक नमुने भरणे आणि प्रत्येक फेरीची माहिती संकलित करणे ही कामे अचूकपणे पार पाडणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा संदिग्धता निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी नियम व सूचनांचा अभ्यास करून जबाबदारीने काम करावे.

मतमोजणी टेबलवरील पर्यवेक्षक, सहायक आणि माहिती संकलन करणाऱ्या पथकांमध्ये योग्य समन्वय असणे गरजेचे आहे. मतमोजणीदरम्यान कोणतेही दडपण न घेता शांतपणे काम करावे. मतपत्रिकांबाबतचे आक्षेप आणि वैध-अवैध मतांसंबंधीचे मुद्दे नियमानुसार निकाली काढावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मतमोजणी प्रक्रियेचे प्रात्यक्षिक

प्रशिक्षणादरम्यान अपर जिल्हाधिकारी तथा महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक अरुण आनंदकर यांनी शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना, तर सहआयुक्त संजय पलांडे यांनी पदवीधर मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. मतमोजणी प्रक्रियेतील शंकांचे निरसनही करण्यात आले.

मतपेट्या उघडणे, ५० मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे, मतपत्रिकांचे वैध-अवैध वर्गीकरण, विविध नमुने भरणे आणि प्रत्येक फेरीचा निकाल संबंधित पथकाकडे जमा करणे याबाबत सविस्तर प्रात्यक्षिक देण्यात आले. निर्धारित नियमांनुसार आणि वेळेत मतमोजणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक सुविधा व व्यवस्थेची माहितीही कर्मचाऱ्यांना देण्यात आली.

अशी असेल मतमोजणीची व्यवस्था

पदवीधर मतदारसंघ : मतमोजणीसाठी १०० टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. पाच कक्षांमध्ये प्रत्येकी १० टेबलच्या दोन रांगा असतील.

शिक्षक मतदारसंघ : मतमोजणीसाठी ४२ टेबल असतील. तीन कक्षांमध्ये प्रत्येकी सात टेबलच्या दोन रांगा मांडण्यात येणार आहेत.

प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहायक आणि एक शिपाई नियुक्त करण्यात आला आहे. या नियोजनामुळे मतमोजणीची प्रक्रिया शिस्तबद्ध, अचूक आणि सुरळीतपणे पार पाडण्यावर प्रशासनाचा भर आहे.
📲Get App