🔥 ट्रेंडिंग अखिल भारतीय आदिम जनजाति संघर्ष मोर्चा... कांग्रेस-डीएमके में गहरा फासला: तमिलना... थिरुपरंकुंड्राम पहाड़ी पर दीपक पर विवा... एमके स्टालिन ने कहा, डिमिनिटेशन पर DMK... चंद्रबाबू नायडू ने सभी आंध्र प्रदेश ND... राम माधव ने कांग्रेस पर DMK के साथ सीम...
29 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

पुणे विभागात समान नागरी संहितेवर जनसुनावणी उत्साहात संपन्न; नागरिकांच्या सूचना व मतांचा शिफारशींमध्ये विचार करणार...!!

✍️ रिपोर्टर: Surendra Uttam Sonawane 🗓 29 नव. 2026, 09:47 PM 👁 14
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

धार्मिक स्वातंत्र्य जपत समानता, न्याय व कायदेशीर संरक्षणावर समितीचा भर..! सुरेंद्र सोनवणे, पुणे प्रतिनिधी | Need 24 News

पुणे विभागात समान नागरी संहितेवर जनसुनावणी उत्साहात संपन्न; नागरिकांच्या सूचना व मतांचा शिफारशींमध्ये विचार करणार...!!

धार्मिक स्वातंत्र्य जपत समानता, न्याय व कायदेशीर संरक्षणावर समितीचा भर..!
सुरेंद्र सोनवणे, पुणे प्रतिनिधी | Need 24 News

पुणे : समान नागरी संहितेबाबत नागरिकांच्या भावना, अपेक्षा, मते आणि सूचनांना महत्त्व देत त्यांचा समितीच्या अंतिम शिफारशींमध्ये विचार केला जाणार असल्याची ग्वाही समान नागरी संहिता विषयक समितीने दिली. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जनसुनावणीत विभागातील विविध जिल्ह्यांतील नागरिक, सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध समाजघटकांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवत आपली मते मांडली.

राज्यभरात समान नागरी संहितेच्या अनुषंगाने विभागस्तरीय जनसुनावणी प्रक्रिया सुरू असून, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था, विविध संघटना तसेच कायदेविषयक क्षेत्रातील जाणकारांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन आपले विचार मांडावेत, असे आवाहन समितीने केले.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या या जनसुनावणीला समितीचे सदस्य तथा माजी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, माजी महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ उपस्थित होते. उत्तराखंडचे माजी मुख्य सचिव शत्रुघ्न सिन्हा यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सहआयुक्त तुषार ठोंबरे, विधी व न्याय विभागाचे सहसचिव किशोर शिंदे, उपसचिव सुजित बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

चार प्रमुख विषयांवर समितीचा अभ्यास..!!

समान नागरी संहितेचे व्यापक स्वरूप स्पष्ट करताना समिती नागरिकांच्या वैयक्तिक व कौटुंबिक जीवनाशी संबंधित नागरी बाबींमध्ये समानता, न्याय, कायदेशीर सुसूत्रता आणि अधिकारांचे संरक्षण यासंदर्भात अभ्यास करत असल्याचे सांगण्यात आले. भारताची विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध असलेली ओळख कायम राखत संतुलित कायदेशीर चौकट विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

या अभ्यासामध्ये विवाह व घटस्फोटाशी संबंधित कायदेशीर प्रक्रिया, कारणे, संबंधित पक्षांचे अधिकार व संरक्षण, वारसा व उत्तराधिकार तसेच लिव्ह-इन रिलेशनशिपमधील व्यक्तींचे कायदेशीर अधिकार, जबाबदाऱ्या आणि संरक्षण या चार प्रमुख विषयांचा समावेश आहे.

धार्मिक स्वातंत्र्य आणि न्याय यांचा समतोल साधण्यावर भर..!!

धार्मिक स्वातंत्र्याचा आधार कायम ठेवून नागरी व कौटुंबिक कायदेशीर बाबींमध्ये समानता आणि न्याय साधणारी संतुलित चौकट विकसित करण्यावर समितीचा भर आहे. प्रस्तावित कायद्याचे स्वरूप निश्चित करताना समितीचा अभ्यास, नागरिकांकडून प्राप्त सूचना आणि संविधानिक तरतुदी विचारात घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

पाच जिल्ह्यांतील नागरिकांचा सहभाग..!!

पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील नागरिकांनी जनसुनावणीमध्ये प्रत्यक्ष तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांमधून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. विविध सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजघटकांच्या प्रतिनिधींनी समान नागरी संहितेच्या विविध पैलूंवर आपले अभिप्राय, सूचना व अपेक्षा समितीसमोर मांडल्या.

१५ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अभिप्रायाची संधी...!!

समान नागरी संहितेबाबत ऑनलाइन माध्यमातून अभिप्राय नोंदवू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर ३७ मुद्द्यांच्या माध्यमातून मते आणि सूचना सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना ऑनलाइन माध्यमातून आपले विचार मांडण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याबाबतची माहिती पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली.
📲Get App