🔥 TRENDING कार्य சிறந்த வியாபாரிகள் விருது வழங்க வேண்டு... India, Canada Reach Fifth Negotiation... Sanjay Gupta Questions Smoking in Film... Nor'easter Hits US Northeast, Floods H... October 2026: Rare Planetary Conjuncti...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
पांगरी अपघातातील तिसऱ्या तरुणाचीही मृत्यूशी झुंज अखेर संपली; हातखंबा बौद्धवाडीवर शोककळा
Local

पांगरी अपघातातील तिसऱ्या तरुणाचीही मृत्यूशी झुंज अखेर संपली; हातखंबा बौद्धवाडीवर शोककळा

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 15 Sep 2026, 09:42 PM 👁 51
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पांगरी येथील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या विकास चंद्रकांत कांबळे यांची सहा महिन्यांच्या उपचारांनंतर मृत्यूशी झुंज अखेर संपली. या दुर्घटनेत आधीच दोन तरुणांचा मृत्यू झाला होता.

हातखंबा बौद्धवाडी परिसरावर कोसळलेले दुःख अखेर आणखी गडद झाले आहे. पांगरी येथील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या विकास चंद्रकांत कांबळे यांची प्राणज्योत मालवली आहे. यापूर्वीच या दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर विकास याची गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर १२ सप्टेंबर रोजी संपली. मुंबईतील कांदिवली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याने अखेरचा श्वास घेतला. या दुर्घटनेतील तिन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याने हातखंबा परिसरावर शोककळा पसरली आहे.

हातखंबा येथील तरुण देवरुख येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. २६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दुचाकीवरून देवरुखहून परतत असताना पांगरी येथील धोकादायक वळणावर दुचाकीवरील ताबा सुटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सुमित विलास कांबळे आणि विकास काशीराम कांबळे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर विकास चंद्रकांत कांबळे हा गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी झालेल्या विकासला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी दुसऱ्याच दिवशी त्याला रत्नागिरी शहरातील खासगी रुग्णालयात हलविले. तेथे अनेक दिवस उपचार सुरू होते. प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याच्यावर एकापाठोपाठ दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र अपघातानंतर तो कोमात होता. उपचारांनंतरही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने पुढील उपचारांसाठी त्याला मुंबईला हलविण्यात आले. ठाण्यानंतर कांदिवली येथील खासगी रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने अखेर सहा महिन्यांची ही झुंज संपली.

विकास हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अपघातानंतर त्याला वाचविण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने अक्षरशः शर्थीचे प्रयत्न केले. सहा महिन्यांपासून प्रत्येक दिवस आशेवर काढणाऱ्या कुटुंबीयांना १२ सप्टेंबर रोजी सकाळी आलेल्या विकासच्या निधनाच्या वार्तेने मोठा धक्का बसला. मुंबई येथील त्याच्या निवासस्थानी १२ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी मित्रपरिवार आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकास चंद्रकांत कांबळे याची ओळख केवळ मित्रपरिवारापुरती मर्यादित नव्हती. तो उत्तम नृत्यकलाकार म्हणूनही परिचित होता. विशेषतः लहान मुलांशी सहज संवाद साधत, त्यांच्या भाषेत गप्पागोष्टी करत त्यांना नृत्याची गोडी लावणे आणि स्पर्धांसाठी तयार करणे ही त्याची खास शैली होती. नृत्य शिकवताना तो मुलांना केवळ स्टेप्स शिकवत नसे, तर त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करायचा. त्यामुळे त्याच्याशी जोडलेली अनेक मुले आज आपल्या ‘विकास दादाला’ शोधत आहेत. एका अपघाताने तीन कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून, हातखंबा बौद्धवाडीवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
📲Get App