🔥 TRENDING મહુવા: કલકવા ગામના વૃદ્ધ 7 દિવસથી લાપત... अनुसूचित जाति आयोग सदस्य बारेलाल अहिरव... जनता दर्शन में मुख्यमंत्री योगी ने सुन... 136 Trekker Stranded in Uttarkashi Ami... Trump Rejects Iran Truce Plan Over Lea... Man Beaten to Death in Ballia Over Ele...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
महिनाभरात चिपळूणच्या दुसऱ्या मंडल अधिकाऱ्यावर लाचखोरीची कारवाई; उमेश राजेशिर्के दहा हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात, लोकांनी वाजविले फटाके.
Crime

महिनाभरात चिपळूणच्या दुसऱ्या मंडल अधिकाऱ्यावर लाचखोरीची कारवाई; उमेश राजेशिर्के दहा हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात, लोकांनी वाजविले फटाके.

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 04 Sep 2026, 11:58 AM 👁 47
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

सावर्डेच्या मंडल अधिकाऱ्यांवरील कारवाईनंतर एकाच महिन्यात तालुक्यातील दुसऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने नागरिकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.चिपळूण मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के १० हजार लाच प्रकरणी रंगेहात जाळ्यात (छायाचित्र: NEED 24 News टीम)

चिपळूण : जमीन खरेदीखताची नोंद करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिपळूणचे मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के यांना रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहात पकडले. महिनाभराच्या कालावधीत चिपळूण तालुक्यातील दुसऱ्या मंडल अधिकाऱ्यावर लाचखोरीच्या प्रकरणात कारवाई झाल्याने महसूल विभागातील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

यापूर्वी सावर्डे येथील मंडल अधिकारी अनिल जाधव यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. त्या कारवाईनंतर महिनाही उलटत नाही तोच चिपळूणचे मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के यांच्यावर दहा हजार रुपयांच्या लाचप्रकरणी कारवाई झाल्याने महसूल विभागातील कथित गैरप्रकारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथील एका नागरिकाने मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. संबंधित तक्रारदाराने जमीन खरेदी केली असून, त्या खरेदीखताची नोंद करण्यासाठी राजेशिर्के यांनी दहा हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना राजेशिर्के यांना पथकाने रंगेहात ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर त्यांच्याविरुद्ध नियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

काही महिन्यांपासून तक्रारींची चर्चा
उमेश राजेशिर्के यांच्या कामकाजाबाबत मागील काही महिन्यांपासून नागरिकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. विविध महसूल कामांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तसेच कामांसाठी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमध्ये होत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, या तक्रारींपैकी किती तक्रारी अधिकृतपणे संबंधित विभागाकडे दाखल झाल्या होत्या. आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे या चर्चांना अधिकृत कारवाईची जोड मिळाली आहे. त्यामुळे महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची पद्धत, नागरिकांच्या तक्रारी आणि त्यावर वरिष्ठांकडून होणारी कार्यवाही याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

महिनाभरात दोन मंडल अधिकारी जाळ्यात

चिपळूण तालुक्यातील महसूल विभागासाठी ही सलग दुसरी धक्कादायक कारवाई ठरली आहे. काही दिवसांपूर्वी सावर्डे येथील मंडल अधिकारी अनिल जाधव यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते. त्यानंतर आता चिपळूणचे मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के दहा हजार रुपयांच्या लाचप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. ही कारवाई होताच स्थानिक लोकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. एकाच तालुक्यातील महसूल यंत्रणेतील दोन मंडल अधिकाऱ्यांवर अल्प कालावधीत झालेल्या या कारवायांमुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
📲Get App