🔥 TRENDING রামভক্ত হনুমানের মুন্ডু কাটা দেহ উদ্ধা... Prime Video Clinches 8 Awards at IIFA... Medha Rana to Star Opposite Ahan Shett... Shajal and Adhora Khan Team Up for Fir... Ajith Kumar’s ‘Dare Devil’ to Commence... Haryana Roadways to Expand Fleet with...
04 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लोणावळ्यातील टायगर पॉईंटवर दुर्दैवी घटना! ४०० फूट खोल दरीत पडून रामनगरच्या २० वर्षीय अनिकेत साबळेचा मृत्यू;

✍️ Reporter: सतिश हजारे 🗓 04 Nov 2026, 01:39 AM 👁 17
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

लोणावळ्यातील टायगर पॉईंटवर दुर्दैवी घटना! ४०० फूट खोल दरीत पडून रामनगरच्या २० वर्षीय अनिकेत साबळेचा मृत्यू; शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश!

लोणावळा प्रतिनिधी : लोणावळ्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या टायगर पॉईंट येथे खोल दरीत पडून एका २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अनिकेत भीमा साबळे (वय २०, रा. रामनगर, भुशीगांव, लोणावळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. टायगर पॉईंट येथील सुमारे ४०० फूट खोल दरीत अडकलेला त्याचा मृतदेह शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुरक्षितपणे बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शिवदुर्ग रेस्क्यू टीमला ३ नोव्हेंबर रोजी उशिरा रात्री टायगर पॉईंट परिसरातून एका तरुणाचा शोध घेण्याबाबत फोन आला होता. टायगर पॉईंट येथील दरीत उतरण्याच्या मार्गाजवळ १०० ते १५० फुट खाली एक तरुण झाडावर अडकलेल्या परिस्थीत दिसल्याचे काही वेळापूर्वी निदर्शनास आले होते. मात्र, त्यानंतर तो दिसेनासा झाल्याने तो दरीत पडला असावा, अशी माहिती देण्यात आली होती.

त्यावेळी टीमचे काही सदस्य विसापूर येथे वाट चुकलेल्या मुलाच्या शोधकार्यासाठी जाण्याच्या तयारीत होते. तर लोहगड येथे एका पर्यटक डॉक्टरांची महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग माकडाने पळवून नेल्याने त्या बॅगेच्या शोधकार्यातही काही सदस्य व्यस्त होते.

अशा परिस्थितीत टायगर पॉईंटवरून मदतीचा फोन आला. मात्र, रात्रीची वेळ, पावसाचे वातावरण आणि टायगर पॉईंटच्या खोल दरीत बचावकार्य करताना उद्भवणारे धोके लक्षात घेऊन रात्रीच्या वेळी मोहीम राबविणे टीमच्या सदस्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याने ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता घटनास्थळी जाण्याचे निश्चित करण्यात आले. याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिसांकडूनही टीमला निरोप मिळाला होता.

अत्यंत कठीण परिस्थितीत रेस्क्यू ऑपरेशन

ठरल्याप्रमाणे आवश्यक हेडलॅम्प, वॉकीटॉकी, दोरखंड, हार्नेस आणि इतर बचाव साहित्य घेऊन शिवदुर्ग रेस्क्यू टीम टायगर पॉईंट येथे दाखल झाली. घटनास्थळाची पाहणी करून प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेण्यात आली.

सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे दरीतील खडक आणि परिसर निसरडा झाला होता. त्यामुळे बचावकार्यादरम्यान विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षिततेसाठी हार्नेसचा वापर करूनच दरीत उतरण्याची तयारी करण्यात आली.

आवश्यक यंत्रणा उभारल्यानंतर योगेश उंबरे आणि हर्ष तोंडे यांनी दरीत उतरण्यास सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने खोल दरीत उतरत असताना अखेर त्यांना सुमारे ४०० फूट खोल दरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे छायाचित्र वर असलेल्या टीमच्या सदस्यांना पाठविण्यात आले. त्यानंतर मृत तरुणाची ओळख अनिकेत भीमा साबळे अशी निश्चित झाली.

दरीत उतरलेल्या दोन्ही सदस्यांनी मृतदेह सुरक्षितपणे पॅक करून स्ट्रेचरला बांधला. त्यानंतर दोरखंडाच्या साहाय्याने मृतदेह वर खेचण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात आली.

खोल दरी, निसरडे खडक आणि प्रतिकूल परिस्थिती अशा अनेक अडचणींचा सामना करत स्ट्रेचरच्या मदतीने मृतदेह वर आणण्याचे काम सुरू झाले. अचानक स्ट्रेचर एका दगडात अडकले त्यानंतर ड्रोन उडवून त्याच्या साहाय्याने ते कुठे अडकले ते पाहण्यात आले आणि दुसर्या बाजूने स्ट्रेचर वर ओढण्यात आले. अखेर अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीमला यश आले. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

या संपूर्ण बचावकार्यात सागर दळवी, सागर कुंभार, योगेश उंबरे, हर्ष तोंडे, प्रिन्स बैठा, महेश मसने, गणेश भांगरे, भावेश दानवे, आनंद गावडे, शैलेश उंबरे, साहेबराव चव्हाण, महादेव भवर, पिंटू मानकर, संतोष मरगजे (पोलीस पाटील), सुनील गायकवाड आदी सहभागी झाले होते.

या मोहिमेत स्थानिक नागरिकांनीही मोठे सहकार्य केले. तसेच लोणावळा ग्रामीण पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभले.

एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असतानाच, अत्यंत खोल आणि धोकादायक दरीतून अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढणाऱ्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या धाडसाचे आणि समर्पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
📲Get App